गोमांस वाहतूक : यावलमधील संशयीताची शांतता समितीतून हकालपट्टी

यावलच्या समितीतील निष्क्रिय सदस्यांचीही होणार पुनर्रचना


यावल (बुधवार, 22 जुलै 2026) : यावल शहरातील शांतता समितीतील एका सदस्याविरोधात बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर संबंधित सदस्याला शांतता समितीतून काढण्यात आल्याची माहिती यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी मंगळवारी सायंकाळी काढलेल्या प्रसिध्दी पत्रान्वये दिली आहे. दरम्यान, शांतता समितीतील काही निष्क्रिय सदस्य हे बैठकीत येत नाही अशांची नावे कमी करून समितीची पुनर्रचना करण्याचाही प्रस्ताव वरिष्ठांकडे त्यांनी सादर केला आहे.

गुन्हा दाखल होताच हकालपट्टी
पोलिस निरीक्षक धारबळे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रानुसार, मंगळवार, 14 जुलै रोजी चितोडा (ता.यावल) शिवारात सईद शाह उर्फ भुरा रहेमान शाह (रा.खिर्णीपुरा, यावल) याला मोटारसायकलवरून सुमारे 10 किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करताना पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीताला अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर 18 जुलै रोजी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला मात्र संबंधित व्यक्ती यावल पोलीस स्टेशनच्या विद्यमान शांतता समितीचा सदस्य असल्याचे समोर आले.

जी व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समाजात आदर्श भूमिका बजावत असतात. अशा समितीतील सदस्याचा अवैध कृत्यांशी संबंध असणे समितीच्या विश्वासार्हतेला आणि प्रभावी कामकाजाला बाधक ठरत असल्याने संबंधित सदस्याला समितीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांना समितीतून काढण्यात आले आहे. शांतता समितीवर सध्या एकूण 52 सदस्य असून त्यापैकी अनेक सदस्य बैठकींना अनुपस्थित राहतात. काही सदस्य निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे त्यामुळे प्रभावी व सक्रिय कामकाजासाठी समितीची पुनर्रचना करून निष्क्रिय सदस्यांची नावे कमी करण्याचा प्रस्ताव देखील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.

एका ज्येष्ठ सदस्यांना समज
यापूर्वीही एका ज्येष्ठ शांतता समिती सदस्याविरोधात गोवंश कत्तल प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला. शांतता समिती सदस्यांनी स्वतःचे चारित्र्य जपत समाजात आदर्श निर्माण करण्याची गरज असल्याचेही प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !