दोन हजारांची लाच भोवली : भुसावळातील महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता जळगाव एसीबीच्या जाळ्यात

सोलर सिस्टीमच्या रिलीज ऑर्डरसाठी मागितली लाच : चोपडे बिल्डींगबाहेर एसीबीचा सापळा यशस्वी


गणेश वाघ
₹2,000 Bribe Costs Dearly: Additional Executive Engineer of Mahavitaran, Bhusawal, Trapped by Jalgaon ACB भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : सोलर सिस्टीम बसवण्याची मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ शहरातील महावितरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील (42) यांना जळगाव एसीबीने तापी नगरातील चोपडा बिल्डींगजवळ अटक केली. ही कारवाई बुधवार, 22 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने महावितरण विभागातील लाचखोर हादरले आहेत. दरम्यान, आरोपीच्या भुसावळातील भाडे तत्वावरील घराची तसेच नाशिकस्थित घराची एसीबीकडून रात्री उशिरापर्यंत झडती सुरू असल्याने त्याचा तपशील कळू शकला नाही. महिन्याला तब्बल दोन लाखांचा घसघशीत पगार असलेल्या वर्गचा एकचा अभियंता अवघ्या दोन हजारांच्या मोहात अडकल्याने त्याची वीज कंपनी वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे सोलर सिस्टीम बसवण्याची एजन्सी आहे. या एजन्सीच्या मार्फत दोन ग्राहकांकडे सोलर सिस्टीम बसवण्यात आली व त्यासाठी आवश्यक असलेली रिलीज ऑर्डर मिळवून देण्याचे काम अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील यांच्याकडे होते. या प्रक्रियेसाठी त्यांनी तक्रारदाराकडे प्रत्येक प्रकरणामागे एक हजार रुपये प्रमाणे एकूण दोन हजारांची लाच बुधवार, 22 रोजी तक्रारदाराकडे मागितली. तक्रारदाराने याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाच पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

आरोपी नितीन पाटील यांनी यावल रस्त्यावरील वीज कंपनीच्या चोपडे बिल्डींगजवळच तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने आरोपीवर झडप घातली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, ग्रेडेड पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला हवालदार संगीता पवार, हवालदार बाळू मराठे आदींच्या पथकाने केली.

आरोपीच्या घराची उशिरापर्यंत झडती
अटकेतील आरोपी नितीन पाटील यांच्या भुसावळातील भाडे तत्वावरील घराची तसेच कुटूंब नाशिकमध्ये स्थायीक असल्याने तेथील घराची एसीबीकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू असल्याने त्याचा तपशील कळू शकला नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !