जळगावात पान-मसाल्याच्या दुकानात चोरी : स्थानिक आरोपींना रामानंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव (शुक्रवार, 24 जुलै 2025) : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमध्ये पानमसाल्याच्या दुकानातून चोरट्यांनी सिगारेटचे दहा बॉक्स व रोकड मिळून 37 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. रामानंद पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत दोन आरोपींना अटक केली. सिद्धार्थ विनोद आढाळे (19, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) व दीपक भगवान सोनवणे (20, रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत.
काय आहे प्रकरण
मंगळवार, 7 जुलै 2026 रोजी पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट परिसरातील पान-मसाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सिगारेटच्या 10 बॉक्ससह रोख रक्कम असा एकूण 37,800 किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यानय सिद्धार्थ व दीपक यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत दोघांनीही घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली तसेच चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सुखाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी तसेच पोलीस कर्मचारी सागर नवरे यांनी केली.



