प्रेयसीने पती व नव्या प्रियकरासह रचला कट : माजी प्रियकराची निर्घृण हत्या
तीन महिन्यांपूर्वी कालव्यात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या ‘ब्लाइंड मर्डर’ चा उलगडा : महिला व प्रियकर अटकेत, पती फरार
अलीगड/युपी (बुधवार, 29 जुलै 2026) : उत्तर प्रदेशातील अलीगड येथे तीन महिन्यांपूर्वी कालव्यात सापडलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाच्या ‘ब्लाइंड मर्डर’चा पोलिसांनी उलगडा केला आहे. तपासात विवाहित महिला कल्पनाने पती संजू आणि नवा प्रियकर लोकेश यांच्या मदतीने माजी प्रियकर अमितची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

महिलेसह प्रियकराला बेड्या
30 एप्रिल रोजी अमितला घरी बोलावून लोखंडी फुंकणी व कड्याने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लॅटिना दुचाकीवरून नेऊन कालव्यात फेकण्यात आला. तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले. पोलिसांनी महिला व तिच्या नव्या प्रियकराला अटक केली असून हत्येत वापरलेली शस्त्रे आणि दुचाकी जप्त केली आहे. या गुन्ह्यातील महिलेचा पती संजू अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.