जळगाव एसीबीची मोठी कारवाई : वरिष्ठांच्या नावाने 70 हजारांची लाच घेणारा भूमी अभिलेख विभागातील भूकरमापकासह डाटा एन्ट्री ऑपरेटर जाळ्यात

शेती मोजणीच्या कामासाठी मागितली 70 हजारांची लाच : तक्रार पडताळणीनंतर करंज, जि.जळगाव बसस्थानक परिसरात सापळा यशस्वी


गणेश वाघ 
भुसावळ (बुधवार, 29 जुलै 2026) : शेती मोजणीच्या कामासाठी तक्रारदाराकडे तब्बल 71 हजार 700 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकासह डाटा एन्ट्री ऑपरेटरला व्यक्तीला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. लाचेचा हा सापळा करंज, जि.जळगाव बसस्थानकावर बुधवारी सायंकाळी यशस्वी करण्यात आला. राहुल ताराचंद कोळी (32) असे अटकेतील भूकर मापकाचे तसेच कल्पेश सोमनाथ पाटील (32) असे अटकेतील डाटा एन्ट्री ऑपरेटरचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

दरम्यान, यापूर्वीही जळगाव भूमी अभिलेख विभागात कारवाया झाल्या असून आता थेट वरिष्ठांच्या नावाने 70 हजारांची लाच मागून ती स्वीकारण्यात आल्यानंतर लाच मागणारा वरिष्ठ अधिकारी नेमका कोण ? असा प्रश्न असून एसीबीकडने आता संबंधित विभागातील बड्या अधिकार्‍यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे आहे लाच प्रकरण
49 वर्षीय तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्या राहत्या गावाच्या शिवारात गट क्रमांक सहा मध्ये शेती असून शेतीचा गट हिस्सा व पोट हिस्सा यांची पडताळणी व मोजणी करण्यासाठी जळगाव भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करीत शासकीय चलन भरले होते. आरोपी राहुल कोळी याने तक्रारदाराच्या भावाच्या उपस्थितीत काम करून देण्यासाठी सुरुवातीला 70 हजार लाचेची मागणी केली होती. या संदर्भात 17 जुलै रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पंचांच्या उपस्थितीत पडताळणीनंतर आरोपीने मोजणीच्या दिवशी बोलू, असे सांगितले होते.

बसस्थानकावर सापळा यशस्वी
बुधवार, 29 रोजी संशयीत हे मदतनीसाला घेवून शेतीची मोजणी करण्यासाठी शेतावर आले व मोजणीनंतर अधिक बोलणी करण्यासाठी करंज गावाच्या बसस्थानकावर तक्रारदाराला बोलावले. तक्रारदार हे भाऊ व पंचांसह भूकर मापक कोळी यांना भेटल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या नावाने 70 हजारांची लाच मागितली व दोन वेळा नोटीस पाठवल्याचे एक हजार दोनशे रुपये तसेच खाजगी मदतनीस यांच्यासाठी पाचशे रुपये अशी एकूण 71 हजार 700 रुपये लाच मागितल्यानंतर सापळा रचण्यात आला. करंज स्थानकावर भूकर मापक कोळी याने लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने आरोपीच्या मुसक्या बांधल्या.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेशमा अवतारे, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार संगीता पवार, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल मनोज पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !