धुळ्यात एसीबीचा मोठा सापळा यशस्वी : इतर मागास बहुजन कल्याण अधिकार्याला 20 हजारांची लाच घेताना बेड्या
10 लाखांचे बिल काढण्यासाठी मागितली लाच : लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ
गणेश वाघ
Major ACB trap successful in Dhule : Other Backward and Bahujan Welfare Officer arrested while accepting a bribe of ₹20,000 भुसावळ (गुरुवार, 30 जुलै 2026) : दहा लाख रुपयांच्या कामाचे बिल काढण्यासाठी तडजोडीअंती दोन टक्के प्रमाणे 20 हजारांची लाच स्वीकारताना धुळ्यातील इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी तथा सहाय्यक संचालक विशाल सुनील चौधरी (30) यास धुळे एसीबीने गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
असे लाच प्रकरण
तक्रारदार हे 33 वर्षीय कंत्राटदार आहेत. त्यांनी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गासाठी राबवण्यात येणार्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मौजे खंडलाय, ता.जि.धुळे येथील हाटकर वस्तीत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे सुमारे दहा लाख रुपयांचे काम केले होते. सदर कामाचे बिल काढण्यासाठी विशाल चौधरी यांनी अडीच टक्क्यांप्रमाणे 30 हजारांची लाच 28 जुलैला मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर बुधवार, 29 रोजी लाच पडताळणी करण्यात आली व यावेळी संशयीत चौधरीने 25 हजारांची लाच मागून 20 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.
लाच स्वीकारताच पडल्या बेड्या
धुळे एसीबीने गुरुवारी सायंकाळी सापळा रचला व आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.




