भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई : अप उधना अमृत भारत एक्स्प्रेसमधून आठ किलो गांजा जप्त

ओडिसातील गांजा तस्कर जाळ्यात : सुरतकडे जाणारा तीन लाख 39 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त


Major action by Bhusawal Railway Protection Force: 8 kg of ganja seized from the Up Udhna Amrit Bharat Express भुसावळ (गुरुवार, 30 जुलै 2026) :अप उधना अमृत भारत एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी करणार्‍याला भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून तब्बल 7.978 किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे बाजारातील किंमत तीन लाख 98 हजार 900 इतकी आहे. बाबू विजय गौडा (23, रा.धमनखौला, डिगापडा कोडला, जि. गंजाम, ओडिशा) असे अटकेती आरोपीचे नाव आहे.

नार्कोस मोहिमेंतर्गत कारवाई
प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे परिसरात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफकडून ऑपरेशन नार्कोस ही विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेदरम्यान गुरुवार, 30 जुलै 2026 रोजी गाडी क्रमांक 19022 अप उधना-अमृत भारत एक्सप्रेसच्या अनारक्षित डब्यात सीआयबी भुसावळचे उपनिरीक्षक सुनील कोळी हे नियमित गस्त व तपासणी करत असताना एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या निदर्शनास आल्या. त्याची चौकशी केली असता बाबू विजय गौडा (वय 23, रा. धमनखौला, डिगापडा कोडला, जि. गंजाम, ओडिशा) हा रेल्वेच्या शौचालयात अंमली पदार्थ लपवून वाहतूक करत असल्याचे उघड झाले.

भुसावळात आरोपीला अटक
यंत्रणेला माहिती मिळताच गाडी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक ओ. पी. मीणा व आरपीएफच्या पथकाने तातडीने कारवाई करत संशयिताला त्याच्या बॅगसह ताब्यात घेतले. पुढील तपासणीसाठी त्याच्यावर सीसीटीव्ही देखरेखीखाली नजर ठेवण्यात आली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षाला देण्यात आल्यानंतर आरपीएफचे श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. ड्युटीवरील ‘वीरू’ या श्वानाने संशयिताच्या बॅगेची तपासणी करताच त्यामध्ये अमली पदार्थ असल्याचे संकेत दिले.

चार गांजा पॅकेट जप्त
त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि सक्षम अधिकार्‍यांची परवानगी घेत राजपत्रित अधिकारी अभय कुमार शर्मा, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (गुड्स), भुसावळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तपासणीदरम्यान बॅगेतून गांजाची चार पॅकेट्स जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन 7.978 किलोग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 3,98,900 इतकी आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यापुढेही सतत सुरू राहणार कारवाई
रेल्वे सुरक्षा बलाने स्पष्ट केले की, ऑपरेशन नार्कोस अंतर्गत रेल्वेमार्गाचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या समाजविघातक प्रवृत्तींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून अशा कारवाया पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहेत. प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे परिसरातील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेमुक्त रेल्वे वातावरण राखण्यासाठी आरपीएफ कटिबद्ध असल्याचेही प्रशासनाने नमूद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !