‘ऑपरेशन प्रवासी सुरक्षा’ला मोठे यश : भुसावळ रेल्वे स्थानकातून दोन मोबाईल चोरट्यांना बेड्या
भुसावळ (गुरुवार, 30 जुलै 2026) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी मध्य रेल्वे, भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने राबविलेल्या ‘ऑपरेशन प्रवासी सुरक्षा’ अंतर्गत उल्लेखनीय कारवाई करत दोन मोबाईल चोरांना अटक केली. आरोपींकडून एकूण 30 हजार 500 किमतीचे दोन चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पुढील कारवाईसाठी आरोपींना जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संशय आल्याने कारवाई
बुधवार, 29 जुलै 2026 रोजी भुसावळ सीपीडीएस ड्युटीवरील प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाहा, प्रधान आरक्षक इमरान खान, आरक्षक भूषण पाटील, आरक्षक विकास गुर्जर तसेच सीआयबीचे आरक्षक कपिल कुमार हे भुसावळ रेल्वे स्थानकाच्या डाउन आउटर परिसरात गस्त घालत होते. यावेळी दोन संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. चौकशीदरम्यान त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना पुढील तपासासाठी आरपीएफ पोस्ट, भुसावळ येथे आणण्यात आले.
आरपीएफ पोस्टचे उपनिरीक्षक सुदामा यादव यांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत एका आरोपीकडून वनप्लस नॉर्ड कंपनीचा सुमारे 20,500 किमतीचा मोबाईल, तर दुसर्या आरोपीकडून सॅमसंग गॅलेक्सी -06 (स्काय ब्ल्यू) हा सुमारे 10,000 किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. एकूण 30 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांचे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोघांनाही लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यता आले.
रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना प्रवासादरम्यान आपल्या मोबाईलसह मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा दल किंवा रेल्वे हेल्पलाइन 139 वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.