नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई : सोशल मीडियावर तलवार फिरवत दहशत माजवणार्याला पडल्या बेड्या
कासीम मुस्ताक हलवाई अटकेत; लोखंडी तलवार जप्त, शस्त्रांचे प्रदर्शन करणार्यांवर कठोर कारवाईचा इशारा
Major crackdown by Nandurbar City Police: Man arrested for terrorizing people by brandishing a sword on social media नंदुरबार (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : नंदुरबार शहरात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत दहशत निर्माण करणार्या तरुणावर नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई केली आहे. आरोपीच्या ताब्यातून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासीम मुस्ताक हलवाई (27, रा.बोडगाव, ता.जि.नंदुरबार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत 1 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे आठ वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली की, हलवाई गल्ली परिसरात एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.
माहितीची तत्काळ दखल घेत गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत कासीम मुस्ताक हलवाई (27, रा.बोडगाव, ता.नंदुरबार) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 तसेच भारतीय हत्यार अधिनियम, 1959 चे कलम 4/25 अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस हवालदार जगदीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश पगारे, राजेश कटके, ललित गवळी, अमित भरवाड, राहुल राठोड, महिला कॉन्स्टेबल निंबा वाघमोडे आदींच्या पथकाने केली.