फेरफार मंजुरीसाठी पाच हजारांची लाच घेणारा मंडळाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
रत्नागिरी एसीबीची सावर्डे येथे धडक कारवाई ; लाचखोरांच्या गोटात खळबळ
Circle Officer caught in ACB trap while accepting a ₹5,000 bribe for mutation approval. चिपळूण, रत्नागिरी (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : सातबारा उतार्यावर फेरफार मंजूर करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे सर्कलचे मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव (38) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रत्नागिरी पथकाने रंगेहाथ पकडले. हा सापळा मंगळवार, 5 रोजी दुपारी 3.10 वाजता सावर्डे मंडळ अधिकारी कार्यालयात यशस्वी करण्यात आला. या कारवाईने महसूल वर्तुळातील लाचखोर प्रचंड हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त मर्चंट नेव्ही कर्मचारी आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने मौजे सावर्डे, ता. चिपळूण येथील गट क्रमांक 1347/3 मधील 218 चौरस मीटर जागा खरेदी केली असून या मालमत्तेच्या सातबारा उतार्यावर फेरफार मंजूर करण्यासाठी मंडळाधिकारी अनिल जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने 3 ऑगस्ट 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
नोटबुकमध्ये ठेवायला लावली लाच
यानंतर बुधवार, 5 ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार सावर्डे मंडळ अधिकारी कार्यालयात गेले असता आरोपी अनिल जाधव यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांची रक्कम स्वतःजवळील नोटबुकमध्ये ठेवण्यास सांगितले. पंचांसमक्ष त्यांनी ती रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, विशाल नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार आणि राजेश गावकर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
लाचखोरांविरोधात तक्रारीचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबीकडे फोन 022-20813598/99 किंवा मोबाईल 9930997700 यावर तक्रार नोंदवावी.
