भरधाव कारची दुचाकीला धडक : बोरकुंड गावातील दाम्पत्य ठार


Speeding car hits two-wheeler : Couple from Borkund village killed धुळे (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने अपघात घडला व त्यात धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील दाम्पत्य ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडला. या अपघाताने बोरकुंड गावावर शोककळा पसरली.

अशोक दिनकर भदाणे (58) व लता अशोक भदाणे (52) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, अपघातामुळे बोरकुंड गावात बुधवारी भरत असलेला आठवडी बाजारही शोकमय वातावरणामुळे ओस पडला.

भरधाव कारची दुचाकीला धडक
मंगळवार, 4 ऑगस्ट सायंकाळी अशोक भदाणे व त्यांच्या पत्नी लता भदाणे हे दुचाकी (एम.एच.18 ए.यू.9957) ने धुळ्यातील काम आटोपून बोरकुंड गावाकडे येत असताना गरताड गावाजवळील रेल्वे पुलावर भरधाव ब्रेझा कार (एम.एच.18 सी.ई.1839) ने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच दोघांचा मृत्यू झाला.

अशोक भदाणे हे परिसरातील शेतकर्‍यांचे विश्वासू मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकर्‍यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केल्याने त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. बुधवारी गावातील अनेक व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून भदाणे दाम्पत्याला श्रद्धांजली अर्पण केली. आठवडी बाजार असूनही गावात नेहमीची गजबज दिसली नाही. सर्वत्र हळहळ आणि शांततेचे वातावरण होते.

बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
अशोक भदाणे यांच्या पश्चात आई-वडील, मुलगा, मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे. बुधवार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !