अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जळगावात 125 पोलीस पाटलांची कार्यशाळा
नागरी हक्क संरक्षण विभागाचा पुढाकार कायद्याची जनजागृती, पीडितांच्या हक्कांसह विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
जळगाव (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 (सुधारित 2015) याची प्रभावी अंमलबजावणी, कायद्याबाबत जनजागृती आणि ग्रामीण स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नागरी हक्क संरक्षण विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या जळगाव पथकातर्फे मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी जळगावात एकदिवसीय नागरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील तब्बल 125 पोलीस पाटील सहभागी झाले.

ही कार्यशाळा सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरभी लॉन्स, एमआयडीसी पोलीस स्टेशनसमोर, अजिंठा चौफुली, जळगाव येथे पार पडली. महाराष्ट्र राज्याचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांच्या अधिपत्याखाली तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस उपअधीक्षक पंडीत सोनवणे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी.यू. पाटील, समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वय अधिकारी महेंद्र पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पी. टी. सपकाळ आणि बार्टी, पुणेचे प्रकल्प अधिकारी अर्जुन गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
जिल्हा सरकारी अभियोक्ता बी.यू.पाटील यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदी, गुन्ह्यांच्या प्रभावी तपासाची प्रक्रिया आणि कायद्याच्या जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.
महेंद्र पाटील यांनी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत अत्याचारग्रस्तांना शासनाकडून मिळणार्या आर्थिक सहाय्य व पुनर्वसन योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पोलीस उपअधीक्षक पंडीत सोनवणे यांनी नागरी हक्क संरक्षण विभागाची रचना, कार्यपद्धती तसेच ग्रामीण भागात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस पाटलांची भूमिका अधोरेखित केली.
बार्टीचे प्रकल्प अधिकारी अर्जुन गायकवाड यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जनजागृती आणि सामाजिक समतेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व विशद केले. तर सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पी. टी. सपकाळ यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमासह अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती देत पोलीस पाटलांनी गावपातळीवर संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपअधीक्षक पंडीत सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रितेश राऊत, सहाय्यक फौजदार प्रविण ढाके, राजेंद्र पवार, मनोज गायकवाड, उज्ज्वला पाटील, जीवन पाटील, दिनेश वंजारी, जितुसिंग परदेशी यांच्यासह नागरी हक्क संरक्षण विभाग, जळगावच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच नागरी हक्क संरक्षण विभाग, नाशिकचे सुरेश परदेशी, दीपाली सहाणे आणि छाया चव्हाण यांनीही कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.
