भुसावळात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : गांजा सेवन करणार्‍याविरोधात गुन्हा


Local Crime Branch action in Bhusawal : Case registered against person for consuming cannabis भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : शहरातील खडका चौफुली परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणार्‍या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, 4 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाचे सेवन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्यासह हवालदार गोपाल गव्हाळे व संदीप चव्हाण यांच्या पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. पथकाने मंगळवार, 4 ऑगस्ट रोजी सुमारे सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास खडाका चौफली परिसरातील बालाजी तोलकाटा शेजारील मोकळ्या जागेत पाहणी केल्यानंतर एक इसम चिलीमच्या साहाय्याने गांजाचे सेवन करताना आढळला. संशयीताला ताब्यात घेताच त्याने आपले नाव मोहमंद रईस मोहमंद युसूफ (30, रा.पीओएच कॉलनी, भुसावळ) असे सांगितले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चिलीम व आगपेटी आढळून आली. दरम्यान, ताब्यात घेताना त्याच्या हातातील चिलीम खाली पडून त्यातील साहित्य नष्ट झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे.

संशयीत सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !