भुसावळातील माऊली प्लाझामध्ये परवानगीविनाच दहा वर्षांपासून नळ कनेक्शन : पालिकेने बजावली नोटीस
रितसर शुल्कासह दंड न भरल्यास पालिका दाखल करणार गुन्हा
भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : भुसावळ शहरातील श्रद्धा नगर परिसरातील माऊली प्लाझा येथे तब्बल आठ-दहा वर्षांपासून पालिकेची कुठलीही परवानगी न घेता दोन नळ कनेक्शनद्वारे पाण्याची उचल करण्यात आल्याचा प्रकार तक्रारीअंती समोर आला आहे. पालिकेच्या अधिकार्यांनी स्थळ पाहणी करीत संंबंधिताना याप्रकरणी नोटीस बजावत शुल्क व दंड भरण्याचे बजावले असून तसे न केल्यास आता रितसर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

काय आहे प्रकरण ?
शहरातील श्रद्धा नगरातील माऊली प्लाझा येथे अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची तक्रार प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी पालिकेकडे केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नगरपालिका अधिकार्यांनी पाहणी केली असता आठ ते दहा वर्षांपासून दोन नळ कनेक्शनद्वारे पाण्याची उचल केली जात असल्याचे स्पष्ट झाले शिवाय संबंधिताकडे नळ कनेक्शन घेतल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याने नोटीस बजावण्यात आली व आठ दिवसांच्या आत कुठलाही खुलासा संबंधितानी न केल्याने आता पालिकेने रवींद्र वामन तळेले यांना आठ दिवसांच्या आत रितसर शुल्क व दंड रक्कम भरण्याचे नोटीसीद्वारे कळवले आहे. तसे न केल्यास नळ कनेक्शन खंडित करून पालिकेच्या पाण्याची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला आहे. या नोटीसीवर पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी यांची स्वाक्षरी आहे. पालिका आता काय कारवाई करते? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात माहिती अधिकाराद्वारे पाठपुरावा करणार्या तक्रारदाराने शहरातील सार्वजनिक सुविधा व नियमांच्या अंमलबजावणीबाबत सर्वांवर समान निकष लागू करण्याची मागणी केली आहे त्यामुळे या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
