कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण : भाजपाचा माजी पदाधिकारी विजय चौधरी नंदुरबार गुन्हे शाखेच्या ताब्यात
Vijay Chaudhary Viral Audio Clip Case नंदुरबार (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिप प्रकरणात धुळे शहरातून नंदुरबार गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चौधरी यांच्या अटकेसाठी खान्देशातील सर्वत्र निषेध मोर्चेे काढण्यात येत आहेत. महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टीपणी केल्याप्रकरणात नंदुरबार येथे गुन्हा दाखल आहे.

व्हायरल क्लीपमुळे वाढल्या अडचणी
विजय चौधरी व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. भाजपमधील हा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणणार्या या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात चौधरी यांचा एकेकाळचा खाजगी सचिव यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले होते. तक्रारदार मंदार चौधरी यांनादेखी नंदुरबार पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
खान्देशातील नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
खान्देशातील राजकीय नेत्यांबद्दल विजय चौधरी यांच्या कथित ऑडीओ क्लीप्स वायरल झाल्या असून त्यामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या क्लीप व्हायरल करण्यात यश टिपरेचा सहभाग समोर आल्यानंतर सुरूवातीला त्यास अटक करण्यात आली. या क्लीप्स कोणत्या ग्रुप्सवर पाठवण्यात आल्या? यामागे कुणा-कुणाचा सहभाग आहे? या संदर्भातील साखळी पोलिस तपासात लवकरच समोर येणार आहे.
धुळ्यातून विजय चौधरी ताब्यात
महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा भाजपाचा माजी पदाधिकारी विजय चौधरी यास गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नंदुरबार गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने ताब्यात घेतले. महिला पदाधिकार्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात चौधरींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ला दिली.
