भुसावळात भर दिवसा कापड व्यावसायीकाचे घर फोडले : 45 हजारांच्या रोकडसह 89 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास
व्यापारी लिप्टसाठी ऑईल आणण्यासाठी बाहेर पडताच झाली चोरी ः पाळत ठेवून चोरी झाल्याचा संशय
भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील गजानन अपार्टमेंटमध्ये राहणार्या कापड व्यावसायीकाच्या घरात भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत 45 हजारांच्या रोकडसह 89 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. भर दिवसा झालेल्या घरफोडीनंतर रहिवासी धास्तावले असून भुसावळ बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे दागिन्यांचे आजच्या बाजारभावानुसार मूल्य सुमारे 13 लाखांहून अधिक आहे.

दोन तासात घरफोडी
तक्रारदार अजय राजकुमार सभागचंदाणी (30) हे कापड व्यावसायीक असून पत्नी मिषका, मुलगी मेहर (5) व अनाया (2) यांच्यासह हुडको कॉलनी, गजानन मंदिराजवळील गजानन अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. सोमवार, 3 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास पत्नी मुलीला शाळेत आणण्यासाठी गेल्यानंतर फिर्यादी यांना झोप लागली व त्याचवेळी लिफ्ट दुरुस्तीच्या कामासाठी योगेश शेगावकर आले व त्यांच्यासह सभागचंदाणी हे चौथ्या मजल्यावर गेले. लिप्ट दुरुस्तीसाठी ऑईल आवश्यक असल्याने ते आणण्यासाठी सभागचंदाणी घराला कुलूप लावून बाहेर पडले व काही वेळेनंतर परत आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील कपाट उघडे दिसले शिवाय लॉकर फोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याचे उघड झाले. त्यानंतर फिर्यादी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली.
89 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास
चोरट्यांनी 17 ग्रॅमचे व 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 28 हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅमचे कानातील टॉप्स, सात ग्रॅम वजनाची व 16 हजार रुपये किंमतीची अंगठी, चार ग्रॅम वजनाची व 16 हजार रुपये किंमतीची अंगठी, 12 हजार रुपये किंमतीचे चार ग्रॅमचे टॉप्स, तीन ग्रॅम वजनाच्या व सहा हजार रुपये किंमतीच्या लहान मुलीच्या चार सोन्याच्या अंगठ्या, 1.20 ग्रॅम वजनाचे व चार हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेंडल, एक ग्रॅम वजनाचे व चार हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेंडल, तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण, दिड हजार रुपये किंमतीचे जोडवे व 45 हजारांची रोकड मिळून एकूण एक लाख 80 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
