अमळनेरमध्ये तीव्र पाणीटंचाई : टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठ्याची पत्रकार संघटनेची मागणी
पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क : प्रशासनाने विलंब न करता उपाययोजना कराव्यात
अमळनेर (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : अमळनेर शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने प्रशासनाकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची ठाम मागणी केली आहे.
प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार
पत्रकार संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त असून सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी हा त्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.


महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 अंतर्गत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविण्याची वैधानिक जबाबदारी नगरपरिषदेकडे आहे. अशा परिस्थितीत शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करणे ही प्रशासनाची कायदेशीर, वैधानिक आणि नैतीक जबाबदारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने प्रशासनाला आवाहन करत पाणीटंचाईग्रस्त भागात कोणताही विलंब न करता तातडीने टँकर सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
