भुसावळात गणेशोत्सव मंडळांनी शाडू मातीच्याच मूर्ती बसवाव्यात : डीवायएसपी केदार बारबोले यांचे आवाहन
मूर्तिकार, मंडळ पदाधिकार्यांच्या बैठकीत स्पष्ट सूचना : उत्सव काळात रहदारीचे नियम पाळण्याचेही आवाहन
Bhusawal Ganesh Mandals Urged to Install Only Eco-Friendly Shadu Clay Idols, Says DYSP Kedar Barbole भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : आगामी गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी आणि व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करू नयेत तसेच मंडळांनी पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी मातीच्या मूर्तींचीच स्थापना करावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीवायएसपी केदार बारबोले यांनी केले.
या अधिकार्यांची उपस्थिती
शहरातील डीवायएसपी कार्यालयात मंगळवारी शहरातील गणेश मूर्तिकार व गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे आणि तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश सरदार प्रमुख उपस्थित होते.


रहदारीचे नियम पाळा
आगामी उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावा यासाठी बैठकीत पोलिस प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान डीवायएसपी केदार बारबोले आणि सहायक निरीक्षक राहुल भंडारे यांनी उपस्थितांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे निर्देश दिले.उत्सवाच्या काळात रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळले जातील, याची दक्षता मंडळांनी घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत दिलेल्या प्रमुख सूचना
पर्यावरणपूरक मूर्ती (शाडू माती)
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी केवळ शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींचा वापर करावा. मूर्तिकारांनी प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती तयार करू नयेत.
मूर्तीची उंची
स्थानिक प्रशासनाने व सरकारने निश्चित करून दिलेल्या गणेशमूर्तीच्या उंचीच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे.
वाद्य व ध्वनी प्रदूषण नियम
डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे आणि न्यायालयीन आदेशांचे तंतोतंत पालन करावे
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना मज्जाव
गणेश मंडळांच्या कार्यकारिणीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा उपद्रवी व्यक्तींचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. अशा व्यक्तींवर पोलिस प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.
अंतर्गत वादांवर कारवाई
मंडळांमधील अंतर्गत वाद किंवा गटबाजीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित सर्व घटकांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
शाडूच्या मूर्ती, सामाजिक उपक्रमांचा होणार सन्मान
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि समाजात सकारात्मक संदेश देण्यासाठी पुढे येणार्या मंडळांचे पोलिसांकडून कौतुक केले जाणार आहे.शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करणार्या आणि सामाजिक संदेश देणार्या गणेश मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येईल, अशी माहिती डीवायएसपी बारबोले यांनी दिली.
नियमभंग केल्यास थेट कारवाईची ताकीद
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. उच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम, मूर्तीच्या उंचीचे निकष आणि मंडळांमधील शिस्त या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.
