रावेर पोलिसांची मोठी कारवाई : आभोडा येथे गोमांस विक्री करणार्या दोन ठिकाणांवर धाड : सुमारे 600 किलो गोमांस जप्त
कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या तीन गोवंशाची सुटका ः कुर्हाडी व सुरेही जप्त
रावेर (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आभोडा गावात गोमांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी धडक कारवाई करत दोन ठिकाणांवर छापा टाकला. या कारवाईत एकूण सुमारे 600 किलो गोमांस, जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणार्या दोन कुर्हाडी व दोन सुरे जप्त केले या शिवाय कत्तलीच्या उद्देशाने आठवडे बाजार परिसरात बांधून ठेवलेल्या तीन गोवंशाची सुटका केली. दरम्यान, रावेर हद्दीत कुठेही गोवंशाची कत्तल होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन रावेर पोलिसांनी केले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आभोडा गावातील बसस्थानक परिसरात एका घरात जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन व त्यांच्या पथकाने छापा टाकला असता, उस्मान हसन कुरेशी (48, रा.आभोडा) याच्या ताब्यातील घरात जनावरांची कत्तल करून गोमांस कापण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत अंदाजे 300 किलो गोमांस, एक कुर्हाड व एक सुरा जप्त करण्यात आला.


दुसर्या कारवाईतही गोमांस जप्त
आणखी एका गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी आभोडा गावातील चावडी भागात दुसर्या ठिकाणी छापा टाकला. तेथे इरफान रेहमान उर्फ लंगड्या कुरेशी (32, रा.आभोडा) हा देखील जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याचे आढळले. या कारवाईतही अंदाजे 300 किलो गोमांस, एक कुर्हाड व एक सुरा जप्त करण्यात आला. संशयीत मात्र पोलिसांना पाहताच पसार झाला.
दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेले गोमांस पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील (रावेर) यांच्या उपस्थितीत नमुने घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक मनोज महाजन, गुन्हे शाखे पथकातील हवालदार ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, समाधान ठाकूर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, राहुल परदेशी, विकार शेख, कॉन्स्टेबल उषा मसाणे आदींच्या पथकाने केली.
