भाजपा महिला पदाधिकार्‍यांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी : नंदुरबारचे भाजपाचे माजी पदाधिकारी विजय चौधरींना चार दिवसांची पोलीस कोठडी


गणेश वाघ
नंदुरबार (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : भाजपचे माजी प्रदेश महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांना भाजपा महिला पदाधिकार्‍यांविषयी अत्यंत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी नंदुरबार गुन्हे शाखेने गुरुवारी धुळ्याजवळील अटक केली होती. संशयीत चौधरी यांना शुक्रवारी नंदुरबार न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण?
सोशल मिडीयावर विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून क्लिप्समध्ये विजय चौधरींनी आपल्याच पक्षातील महिला नेत्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, धक्कादायक आणि जातीवाचक विधाने केल्याचा आरोप आहे.



मंत्री रक्षा खडसेंबद्दल अपशब्द
एका क्लिपमध्ये चौधरी हे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलत असल्याचा दावा आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द आणि शिविगाळ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संभाषणादरम्यान मंत्री महाजन यांनी चौधरी यांना एकदाही न अडवल्याने या क्लिपची मोठी राजकीय चर्चा झाली.

डॉ.हिना गावित यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी
माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबतही जातीवाचक आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच डॉ.हिना गावित यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून विजय चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली. आतापर्यंत विजय चौधरी यांच्यावर सुमारे तीन गुन्हे दाखल करण्यात आले.

धुळ्यातून आवळल्या मुसक्या
विजय चौधरी हे धुळ्याजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कळाल्यानंतर पथकाने त्यांना गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले तर रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली.

स्वीय सहाय्यकाविरोधातही गुन्हा
विजय चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, चौधरी यांच्या मोबाईलमधील ध्वनीफिती त्यांच्या स्वीय सहाय्यकाने चोरी करून आणि इतरांना विकून समाजमाध्यमांवर पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वीय सहाय्यकाला अटकही करण्यात आली व चार दिवसांच्या पीसीआरनंतर त्याला जामीन मंजूर झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !