धुळ्यात आमदारांच्या कार्यालयात चोरी : स्थानिक चोरट्यांना शहर पोलिसांकडून अटक
धुळे (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : धुळ्यातील आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयात चोरी करून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्थानिक आरोपींना धुळे धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून चोरीतील 5,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जावीद हमीद शहा (38, तिरंगा चौक, धुळे) व अकबर मुस्तकीम बागवान (37, रा.शरीफ हॉटेलसमोर, तिरंगा चौक, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट 2026 रोजी रात्री आठ ते 5 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे तीन वाजेदरम्यान कालावधीत धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुरु-शिष्य स्मारकाजवळील आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयात चोरी करून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना गस्तीवरील पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून पाच हजार रुपये किंमतीचा डीव्हीआर, पाचशे रुपये किंंमतीचा डिश टीव्ही सेटअप बॉक्स, स्क्रू ड्रायव्हर, तीन तुटलेले कुलूप व काळ्या रंगाची बॅग जप्त करण्यात आली.


यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर निरीक्षक हेमंतकुमार भामरे, उपनिरीक्षक नितीन चौधरी, अंमलदार सुमित ठाकूर, रवीकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, अमित रनमळे, तुषार पारधी, सुदर्शन मोरे, प्रशांत नाथजोगी, धम्मपाल वाघ, दीपक जगताप, हिमांशू ठाकूर, रोहिणी पवार, शाकीर शेख, भूषण ठाकरे, हनीफखा पठाण आदींच्या पथकाने केली.
