मुदखेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल : निष्काळजी कारचालकाला दोन वर्षांचा कारावास

रस्ता अपघातात महिलेचा झाला होता मृत्यू : प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयाचा कठोर निर्णय


मुदखेड (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : रस्ता अपघात प्रकरणात निष्काळजीपणे वाहन चालवून एका महिलेचा मृत्यू व दुसर्‍या महिलेला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी मुदखेड येथील प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी कार चालकास दोन वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा तसेच दंड ठोठावला.

मुदखेड तालुका न्यायालयाच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी मा. न्यायमूर्ती श्रीमती शितल कौर यांनी हा निकाल शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026 रोजी सुनावला.



या प्रकरणातील आरोपी राघवेंद्र नामदेव पवितवार (रा.मुदखेड) याने 16 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास बारड येथून मुदखेडकडे येताना कार (एम.एच.26 सी.बी.7722) भरधाव व निष्काळजीपणे चालवत रस्त्याने पायी जात असलेल्या अरुणाबाई हनुमंत टिमकेकर यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अरुणाबाई टिमकेकर यांचा मृत्यू झाला, तर सत्वशीला दिगंबर वानखेडे या गंभीर जखमी झाल्या.

या घटनेनंतर मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 253/2024 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 337, 338 आणि 304(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे यांनी केला असून त्यांना हेड कॉन्स्टेबल केशव कदम यांनी सहकार्य केले.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे सरकारी वकील सचिन बी.पवार यांनी प्रभावी बाजू मांडली, तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड.के.डी. हामंद यांनी काम पाहिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच दंडाची शिक्षा सुनावली. निष्काळजी वाहनचालकांविरोधात न्यायालयाने दिलेला हा निर्णय रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !