यावलमध्ये गो मांस विक्रीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा : चार गोवंशाची सुटका


यावल (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : शहरातील डांगपुरामधील मन्यार वाडा परिसरात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणार्‍यांवर यावल पोलिसांनी मोठी कारवाई केली. कारवाईत 65 किलो गोमांस, चार जिवंत गोवंश जनावरे, तीन म्हैसवर्गीय जनावरे असे 7 जिवंत जणावरे तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी साधने असा एकूण 98 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी झाली कारवाई
शहरातील डांगपुरा भागातील मण्यारवाडा परिसरात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. येथे शनिवारी पहाटे सहा वाजता निरीक्षक धारबळे हे सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार हितेश बागुल, मोहन तायडे, राजेंद्र पवार, अनिल साळुंके, पुरूषोत्तम पाटील, उज्वल पाटील या पथकासह या भागात दाखल झाले व त्यांनी येथून सैय्यद रशीद निसार कुरेशी (45), सैय्यद आसीफ सैय्यद निसार (33), सैय्यद हफीज सैय्यद निसार कुरेशी (35) आणि सैय्यद अन्सार सैय्यद निसार (50, सर्व रा. डांगपुरा, मन्यारवाडा) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे राहत्या घराच्या तळघरातून सुमारे 65 किलो वजनाचे कच्चे गोमांस (किंमत सुमारे 13 हजार 100 रुपये), कत्तलीसाठी वापरलेले लोखंडी कुर्‍हाड, कोयता, सुरा, लाकडी कुंदा, वजनकाटा व वजनमापे आणि गोमांस विक्रीसाठी वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.




चार गोवंशाची सुटका
सुमारे 85 हजार रुपये किंमतीची चार जिवंत गोवंश जनावरे आणि तीन म्हैसवर्गीय जनावरे ताब्यात घेण्यात आली. ही जनावरे कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय आणून तळघरात बांधून ठेवण्यात आली हेाती. या कारवाईत गोमांस व जनावरे तसेच कत्तलीसाठी वापरलेले साहित्य असा एकूण 98 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पाचपोळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !