सावदा पोलिसांची मोठी कारवाई : तीन बैलजोड्या चोरणार्‍या रावेरसह भुसावळ तालुक्यातील त्रिकूटाला बेड्या

चोरीस गेलेल्या सहा बैलांसह बोलेरो व दुचाकीसह सात लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त


सावदा (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावदा बु.॥ गाव परिसरातील तीन शेतकर्‍यांच्या मालकीच्या तीन बैलजोड्या चोरट्यांनी लांबवल्या होत्या. सावदा पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या आत भुसावळसह रावेर तालुक्यातील त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून सहा बैल तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण 7 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरणी
सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावखेडा बुद्रुक गाव परिसरात 7 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12.30 ते पहाटे 5 वाजेच्या दरम्यान गोठ्यातून तीन बैलजोड्या चोरीस गेल्या होत्या. अलाउद्दीन नवाब तडवी, गुलशेर बशीर तडवी आणि संजू नवाब तडवी (सर्व रा. सावखेडा बुद्रुक, ता. रावेर) यांच्या मालकीचे एकूण सहा बैल, अंदाजे 90 हजार रुपये किमतीचे, अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याने सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.




सीसीटीव्ही फुटेजने तपासाला मिळाली दिशा
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5.18 वाजता सावखेडा गावात मोटारसायकलवरून दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.

पोलिसांनी सदर इसमांची गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता त्यांची नावे आवेश खान एजाज खान (20, रा.ख्वाजानगर, सावदा, ता.रावेर) व शेख हयात शेख मासूम (25, रा.मन्यारवाडा, चिनावल, ता. रावेर) अशी निष्पन्न झाली. दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदार नासीर शेख चांद कुरेशी (42, प्रतिभानगर, वरणगाव) व शेख राजीक (रसलपूर, ता.रावेर) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. शेख राजीक व्यतिरिक्त तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

सहा बैलांसह बोलेरो आणि दुचाकी जप्त
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या एकूण 90 हजार रुपये किंमतीच्या तीन बैलजोड्या म्हणजेच सहा बैलांची सुटका करून ते मूळ मालकांच्या ताब्यात दिली. आरोपी नासीर शेख चांद कुरेशी याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले सहा लाख रुपये किमतीचे बोलेरो मॅक्स पिकअप वाहन (एम.एच.19 सी.एक्स.1667) आणि 20 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (एम.एच.19 ईएस 6611) जप्त करण्यात आली. एकूण सात लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आरोपींना न्यायालयीन कोठडी
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, एएसआय जयराम खोडपे, हवालदार निलेश बाविस्कर, मेहरबान तडवी, संजीव चौधरी, अतुल तडवी, संजय तडवी, चालक नामदेव कापडे आदींच्या पथकाने केली.

पशू पालक सुखावले
चोरीस गेलेल्या पशुधनाचा तातडीने शोध घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात सावदा पोलिसांना यश आल्याने परिसरातील पशू पालकांमध्ये या कारवाईचे समाधान व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !