स्ट्रीट लाईट दुरुस्ती करताना शॉक लागून झिरो वायरमनचा मृत्यू : चोपडा तालुक्यातील प्रकार
स्ट्रीट लाईट दुरुस्ती करताना शॉक लागून झिरो वायरमनचा मृत्यू चोपडा तालुक्यातील प्रकार
चोपडा (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : चोपडा तालुक्यातील गणपूर येथे ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट दुरुस्तीचे काम करत असताना 40 वर्षीय ‘झिरो वायरमन’चा विजेचा मृत्यू झाला. शनिवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. रामचंद्र भिला पाटील ( 40, रा. चौगाव, ता.चोपडा) असे मृताचे नाव आहे.




काय आहे नेमके प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र पाटील हे चौगाव येथे वास्तव्यास होते व गावासह परिसरात खाजगी स्तरावर ‘झिरो वायरमन’ म्हणून काम करीत होते. शनिवारी ते गणपूर ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचे काम करण्यासाठी गेले होते. सकाळी सुमारे 10 वाजता वीजपुरवठा बंद असल्याचे समजून ते इलेक्ट्रिक पोलवर चढून काम करू लागले.
मात्र काम सुरू असतानाच अचानक वीज तारांमध्ये प्रवाह सुरू झाला त्यामुळे रामचंद्र पाटील यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का इतका तीव्र होता की, ते पोलवरून खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गलंगी येथील 33 केव्ही सबस्टेशन अंतर्गत लासुर भागाचे अभियंता संदीप राजपूत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ग्रामस्थांनी रामचंद्र पाटील यांना उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गौरव नेवे यांनी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रामचंद्र पाटील यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी चौगाव येथे आणण्यात आले. शनिवारी सायंकाळी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामचंद्र पाटील यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा अशा प्रकारे अचानक आणि अपघाती मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.