अल्पवयीन मुलीची प्रसूती ; पती, सासरच्यांसह आई-वडिलांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा

धुळे रुग्णालयात बाळ जन्माला आल्यावर उघड झाला बालविवाह ; बोदवड पोलिसांत गुन्हा वर्ग


बोदवड (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : जळगाव जिल्ह्यात बालविवाहाचा प्रकार समोर आला असून अल्पवयीनाने लग्नानंतर बाळाला जन्म दिल्याने या प्रकरणी पतीसह सासरचे व आई-वडीलांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आाला

असे आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील खोपरपाटा येथील मूळ रहिवासी असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीचा (17, जन्मतारीख 10/02/2010) विवाह दोन वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांनी रोशन तोरे याच्याशी लावून दिला होता.





लग्नानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली. तिला 1 ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथे दाखल करण्यात आले, तेथे तिने मुलाला जन्म दिला. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदरम्यान व कागदपत्रांची पडताळणी करताना ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याचे लक्षात येताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या ग्रेड पो.उपनिरीक्षक रेखा सोनवणे यांनी धुळे येथे ‘झिरो एफआयआर’ (क्र. 00/2026) नोंदवला. घटनास्थळ व सासर बोदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने गुरुवार, 7 ऑगस्ट हा गुन्हा बोदवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात पती , सासू , सासरे रा. ता. बोदवड) तसेच मुलीची आई वडील (रा. ता. अमळनेर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 64(2), बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 9, 10, 11 आणि पॉक्सो कायदा कलम 6 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव तपास करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !