पालघर जिल्हा हादरला : मित्रासोबत आलेल्या तरुणीचे सहा नराधमांनी तोडले अब्रुचे लचके
पालघर (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर सहा जणांनी मिळून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष घटनेमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण ?
पालघरच्या तलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक घटनेप्रकरणी पीडित 19 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर मित्रासोबत उभी असताना दोन दुचाकींवरून आलेल्या सहा नराधमांनी तिला एका बंद पडलेल्या डाक बंगल्यात बळजबरीने नेऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तलासरी पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत सहापैकी तीन आरोपींना अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत, तर उर्वरित तीन फरार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
नेमके काय घडले?
पीडित 19 वर्षीय तरुणीने तलासरी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती तिच्या मित्रासह दुचाकीवरून फिरायला गेली असताना खामगाव येथे त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडले. नेमक्या त्याच वेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी तरुणीच्या मित्राला दमदाटी करून तेथून हाकलून लावले. त्यानंतर त्या तिघांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले.
बंद पडलेल्या डाक बंगल्यावर नेऊन सामूहिक अत्याचार
या नराधमांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खामगावजवळील एका बंद डाक बंगल्यावर नेले. तिथे बंगल्याच्या कट्ट्यावर या सहा जणांनी तिच्यावर अमानुषपणे सामूहिक लैंगिक अत्याचार केला. या भयंकर घटनेची फिर्याद दाखल होताच तलासरी पोलिसांनी तत्परतेने चक्र फिरवत सहापैकी तीन आरोपींना तातडीने बेड्या ठोकल्या आहेत तर पसार आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती तलासरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय गरुड यांनी दिली.



