चाळीसगाव तालुका हादरला : कौटूंबिक वादातून पतीची हत्या
पत्नीसह मुलाविरोधात खुनाचा गुन्हा : दुचाकी सोडवण्याचा वाद जीवावर
Chalisgaon Shaken: Wife and Son Allegedly Murder Man Over Money Dispute चाळीसगाव (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथे पत्नीसह मुलाने मिळून पतीची हत्या केली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी पैसे मागण्यावरून झालेल्या घरगुती वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
करणसिंग रामसिंग वंजारी (45, रा.आंबेहोळ, ता. चाळीसगाव) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे तर पत्नी अरुणाबाई करणसिंग वंजारी व मुलगा विशाल करणसिंग पवार/वंजारी यांच्याविरोधात पोलीस पाटील रमेश चरणसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.



काय आहे प्रकरण?
चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंबेहोळ येथील राहत्या घरी ही घटना घडली. करणसिंग वंजारी यांनी गावातील एका इसमाकडे आपली दुचाकी गहाण ठेवली होती. ती गाडी सोडवण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले.
दरम्यान, मुलगा विशाल याने वडिलांच्या डोक्यात सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप मारला. यामुळे करणसिंग खाली कोसळले. त्यानंतर पत्नी अरुणाबाई आणि मुलगा विशाल या दोघांनी मिळून दोरीने गळा आवळून करणसिंग यांची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत करत आहेत.