जळगाव रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यदिनी जामनेरच्या तोतया महिला सुरक्षा कर्मचार्याला अटक
महिलेने यापूर्वी पोलिसाचा गणवेश परिधान लग्नासाठी अनेकांना गंडा घातल्याचा संशय
भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : जळगाव रेल्वे स्थानकावरील सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने जामनेर तालुक्यातील रेल्वे सुरक्षा बलाचा गणवेश परिधान केलेल्या तोतया महिला कर्मचार्याला बड्या ठोकल्या आहेत. संबंधित महिलेने यापूर्वीदेखील पोलिसांचा गणवेश परिधान करून अनेकांना ठगवल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनिषा युवराज गोपाल (21, कापूसवाडी, ता.जामनेर) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.
संशय आल्यानंतर कारवाई
स्वातंत्र्यदिनी जळगाव रेल्वे स्थानकावर सुरक्षा बलाने गस्त वाढवली असतानाच प्लॅटफार्म क्रमांक तीनवर रेल्वे सुरक्षा बलाचा गणवेश परिधान केलेली महिला सतर्क सुरक्षा यंत्रणेतील जळगाव निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल विनोद जेठवे व लक्ष्मण पारकर यांच्या दृष्टीपथास पडली. महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर वरिष्ठांना कल्पना दिल्यानंतर संबंधित महिलेची चौकशी केल्यानंतर तिने नाशिक येथे नियुक्तीस असल्याचे सांगितले. महिलेच्या गणवेशावरील नावानंतर नाशिक आरपीएफला संपर्क साधल्यानंतर अशी कोणतीही महिला नाशिकमध्ये कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले तर महिला आयडी कार्डही सादर करू शकली नाही.
विवाहासाठी लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न?
चौकशीत संबंधित महिला जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. तिने यापूर्वी विवाहाच्या उद्देशाने लोकांना प्रभावित करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची वर्दी परिधान करून फोटो काढल्याचे सांगितल्याची माहिती रेल्वे बलाने दिली. स्वातंत्र्यदिनीदेखील ती कुणाचीतरी फसवणूक करण्यासाठी रेल्वे स्थानकावर तोतया बनून आल्याचे स्पष्ट झाले.
कागदपत्रे जप्त : गुन्हा दाखल
महिलेच्या ताब्यातून कथित बनावट चारित्र्य प्रमाणपत्र आणि पोलीस पडताळणीची प्रतही जप्त करण्यात आली तर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
