महावितरणचा वीजचोरांना दणका : चार महिन्यांत 19 हजार 599 वीज चोर्‍या उघड


मुंबई (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : महावितरणने वीजचोरीविरोधात राज्यभरात धडक मोहीम तीव्र केली आहे. गेल्या चार महिन्यांत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच अन्य वर्गवारीतील तब्बल 19 हजार 599 वीजचोर्‍या उघडकीस आणल्या आहेत. यापैकी केवळ जुलै महिन्यात 11 हजार 32 वीजचोर्‍यांचा पर्दाफाश झाला आहे.

14 कोटी 12 लाखांची वसुली
थेट तारेला हूक लावून वीज वापरणे तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याच्या 15 हजार 965 प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. या प्रकरणांमध्ये तब्बल 30 कोटी 36 लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले असून, संबंधित ग्राहकांना वीजचोरीची बिले बजावण्यात आली आहेत. त्यापैकी 6 हजार 629 ग्राहकांनी 14 कोटी 12 लाख रुपयांचा भरणा केला आहे. उर्वरित 3 हजार 634 पेक्षा अधिक प्रकरणांचे मूल्यांकन सुरू आहे.

कोणत्या विभागात किती वीजचोर्‍या?

कोकण प्रादेशिक विभाग : 7,496

नागपूर प्रादेशिक विभाग : 4,221

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग : 4,597

पुणे प्रादेशिक विभाग : 2,985

अशा प्रकारे राज्यभरात एकूण 19 हजार 599 वीजचोर्‍या उघडकीस आल्या आहेत.

यापैकी 15 हजार 965 प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून संबंधित ग्राहकांना 30 कोटी 36 लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे. आतापर्यंत 6 हजार 629 ग्राहकांनी 14 कोटी 12 लाख रुपयांचा भरणा केला आहे. तसेच वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये नियमानुसार तडजोड शुल्काची रक्कमही आकारण्यात येत आहे. आतापर्यंत 4 हजार 959 प्रकरणांत 1 कोटी 85 लाख रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.

जुलैमध्येच 11 हजारांहून अधिक वीजचोर्‍या उघड
एप्रिल ते जून या तीन महिन्यांत 8 हजार 567 वीजचोर्‍या उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर 1 जुलैपासून मोहीम आणखी तीव्र करण्यात आली. थेट तारेला हूक लावून किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरणार्‍या ग्राहकांविरुद्ध महावितरणने मोठी कारवाई केली.

थकबाकीदारांवरही महावितरणची नजर
वितरणातील आणि वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून वीजचोरीविरोधात ही मोहीम राबवली जात आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या जोडण्यांचीही तपासणी सुरू आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित व्यक्तीने अन्य ठिकाणाहून अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध वीजचोरीची कारवाई करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !