तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर मौलवीचा अत्याचार


ठाणे (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : आजार बरा करण्याचे आश्वासन देत तंत्र-मंत्र आणि कथित अघोरी विधींच्या नावाखाली 30 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरातील वर्‍हाळ देवी चौक परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गाह येथे घडला. या प्रकरणी दर्ग्यातील मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख (50) याच्याविरोधात भिवंडी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

काय आहे प्रकरण ?
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आजारावर उपचार करण्यासाठी ती 2024 मध्ये आरोपी मौलवीकडे गेली होती. आजार बरा करून देण्याचे आश्वासन देत आरोपीने तंत्र-मंत्र, जंतर-मंतर आणि विविध कथित विधी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान महिलेचे केस सोडणे, हात धरणे, लिंबू कापणे तसेच उपचाराच्या नावाखाली अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महिलेने विरोध केला असता संबंधित विधी उपचारासाठी आवश्यक असल्याचे आरोपीने सांगितल्याचा दावा आहे. त्यानंतर रात्री दर्ग्यात बोलावून विविध विधींच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच उपचाराच्या नावाखाली तिचे व्हिडिओ कॉलद्वारे चित्रीकरण करण्यात आले आणि कथित अत्याचाराचेही व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे तिला सांगण्यात आले.

कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती आरोपीने फोनवरून दिल्यानंतर महिला घाबरली. त्यानंतर तिने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 मधील कलम 3, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66 ई आणि 67 अन्वये गुन्हा दाखल केला.

युपीत पळून जाण्यापूर्वीच पडल्या बेड्या
दरम्यान, आरोपी मौलवी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत भायखळा रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणातील कथित व्हिडिओ कोणी तयार केले, ते कुठे आणि कशा प्रकारे व्हायरल झाले, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास भिवंडी शहर पोलीस करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !