कासोद्यात कौटुंबिक वादातून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न : पतीला बेड्या
कासोदा, ता.एरंडोल (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : कौटुंबिक वादातून कासोदा गावातील पतीने पत्नीला क्रूर वागणूक देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार, 12 ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण ?
कासोदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनाक्षी निलेश पाटील (24, गढीवॉर्ड कासोदा, ह.मु.उमराव कॉटर्र, देवळाली कॅम्प, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून त्यांचे पती निलेश भगवान पाटील यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षण व कमाईवरून टोमणे दिल्याचा आरोप
बुधवार, 12 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कासोदा येथील राहत्या घरातील बेडरूममध्ये दाम्पत्य झोपण्यासाठी गेले असता आरोपीने पत्नीच्या शिक्षणावरून तसेच ती कमाई करत नसल्याच्या कारणावरून टोमणे मारून मानसिक त्रास दिला शिवाय माझ्या मामाच्या मुलीशी लग्न केले असतेतर मला खूप पैसे मिळाले असते, तू घरी बसून फुकट खाते म्हणत पत्नीला त्रास दिला. यावेळी आरोपीने पांढर्या रंगाच्या उपरण्याने पत्नीच्या गळ्याला फास देत पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेत पत्नी जखमी झाली असून तिच्यावर धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा
घटनेनंतर उपचार घेत असताना फिर्यादीचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानुसार प्राप्त कागदपत्रांच्या आधारे रविवार, 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4.09 वाजता कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश भगवान पाटील याला अटक केली आहे.
