भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई : गीतांजली एक्स्प्रेसमधून दहा लाखांचा गांजा जप्त


भुसावळ (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : रेल्वेतील गांजातस्करीविरोधात सातत्याने कारवाई सुरू असतानाच पुन्हा युपतील प्रवाशाला दहा लाखांच्या गांजासह भुसावळात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसमधून आरोपी गांजा वाहतूक करताना सुरक्षा यंत्रणांनी त्यास ताब्यात घेतले. 19.959 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्यांची अंदाजे किंमत नऊ लाख 97 हजार 950 रुपये आहे. अरुणकुमार उर्फ सोनू लालू प्रसाद (25, रा.ग्राम चरतीपुर, पोस्ट बारा, जिल्हा कानपूर, उत्तरप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

संशय आल्यानंतर कारवाई
रविवार, 16 रोजी ट्रेन क्रमांक 12860 गीतांजली एक्सप्रेस भुसावळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 03 वर येत असताना, ड्युटीवर तैनात सुरक्षा आरक्षक लोकेश्वर यादव यांनी पुढील बाजूकडून दुसर्‍या डब्यातून उतरून खांद्यावर पांढर्‍या प्लास्टिकची गोणी घेऊन जात असलेल्या एका प्रवाशावर संशय आल्यानंतर त्यास अडवून विचारपूस करण्यात आल्यानंतर तो गोंधळल्याने संशय बळावला. संशयीताबाबत माहिती सहायक सुरक्षा निरीक्षक महिलाल सिंह यांना देण्यात आल्यानंतर या घटनेची माहिती तत्काळ मंडळ सुरक्षा नियंत्रक, भुसावळ, वरिष्ठ अधिकारी, शासकीय रेल्वे पोलीस भुसावळ, सीआयबी भुसावळ तसेच संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या ड्युटीवर असलेल्या शोधक श्वान वीरूकडून संशयित गोणीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गोणीमध्ये अंमली पदार्थ असल्याची पुष्टी झाली. यावेळी गोणीमधून गांजाची 10 पाकिटे/बंडले जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई सीआयबीचे कॉन्स्टेबल कपिल कुमार, राजपत्रित अधिकारी जितेंद्र सिंहा, आरपीएफ सहायक सुरक्षा आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जप्त केलेला गांजा सहायक सुरक्षा निरीक्षक महिलाल सिंह यांनी नियमानुसार जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतला. आरोपीविरुद्ध भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !