जळगावात आरटीओ एजंट सात हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
दिव्यांग वकिलाकडून वाहन पासिंगसाठी मागितली लाच : एजंटांच्या गोटात प्रचंड खळबळ
जळगाव (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : वाहनाच्या कायमस्वरूपी पासिंगच्या कामासाठी दिव्यांग वकिलाकडून 10 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती सात हजार रुपये स्वीकारणार्या जळगावातील खाजगी एजंटला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. योगेश रामभाऊ पाटील (39, रा.आदर्शनगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वकिलाकडे मागितली लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदार हे 48 वर्षीय खाजगी वकील असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी 1 जुलै 2026 रोजी खान्देश मोटार शोरूममधून अल्टो कार खरेदी केली होती. या वाहनाची आरटीओ कार्यालयात तात्पुरती नोंदणी 3 ऑगस्टला झाल्यानंतर कायमस्वरूपी पासिंगसाठी ते 12 ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात गेले होते. यावेळी खाजगी एजंट योगेश पाटील याने तक्रारदारांचे वाहन कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित कर्मचार्यांकडून काम करून आणण्याच्या मोबदल्यात 10 हजार लाचेची मागणी केली व तडजोड होऊन आठ हजार 500 रुपये देण्याचे ठरले.
जळगाव एसीबीकडे तक्रार
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिली व तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी जळगाव आरटीओ कार्यालयाच्या प्रांगणात सापळा रचण्यात आला. सात हजारांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताच खाजगी एजंट योगेश पाटील यास अटक करण्यात आली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. या कारवाईने आता संबंधित विभागातील अधिकारी एसीबीच्या रडारवर असून त्यांचीदेखील चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार सुनील वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.
