पाचोरा शहरात धाडसी घरफोडी : दिड लाखांचा ऐवज लंपास
पाचोरा (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : पाचोरा शहरातील भास्कर नगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
शुभम राजेंद्र जाधव (रा.गोराडखेडा, ता.पाचोरा) हे बजाज फायनान्स कंपनीत कलेक्शन मॅनेजर आहेत. त्यांच्या बहिणीचे पाचोरा शहरातील भास्कर नगर येथे घर असून त्यांची बहीण मुंबई येथे वास्तव्यास असल्याने शुभम जाधव हे त्या घरात राहत होते. त्यांच्या कामानिमित्त वसूल केलेली रक्कमही काही काळ त्या घरात ठेवण्यात आली होती. शुभम जाधव यांनी 14 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत फायनान्स कंपनीसाठी वसूल केलेली 90 हजारांची रोकड घरात ठेवली होती. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची सुटी आणि 16 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने ही रक्कम सोमवारी बँकेत जमा करण्याचे नियोजन होते. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता त्यांनी भास्कर नगरातील घराला कुलूप लावले आणि ते गोराडखेडा येथे गेले.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेवून संधी साधली. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील बजाज फायनान्स कंपनीची 90 हजार रुपयांची रोकड, सुमारे 50 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि 1 हजार 500 रुपये किमतीची चांदीची पैंजण असा एकूण एक लाख 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
16 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10 वाजता शुभम जाधव भास्कर नगरातील घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता रोकड, सोन्याची अंगठी आणि चांदीची पैंजण चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ पाचोरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शुभम जाधव यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
