साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यासह शासकीय ठेकेदार धुळे एसीबीच्या जाळ्यात
अनुदानाची रक्कम मंजूर करण्यासाठी स्वीकारली 20 हजारांची लाच ः लाचखोर हादरले
धुळे (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : घरकुलाच्या उर्वरित अनुदानाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी लाभार्थीकडे 20 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन विजयसिंग राजपूत (30, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) तसेच शासकीय कंत्राटदार रोहन रोहिदास देवरे (31, गोपाळनगर, साक्री, जि.धुळे) यांना धुळे एसीबीने साक्रीजवळील शेवाळी फाट्यावरून सोमवारी रात्री अटक केली.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे 45 वर्षीय पुरुष असून ग्रामीण गृह निर्माण अभियंता राजपूत यांनी तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना जामदे येथे ग्रामपंचायतीमार्फत घरकुल मंजूर झाल्यानंतर अनुदानाची काही रक्कम मिळताच घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. सुमारे एक महिन्यापूर्वी ग्रामीण गृह निर्माण अभियंता मनमोहन राजपूत याने अनुदानाचे काही हप्ते अदा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे प्रत्येक घरकुलामागे पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण 25 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने त्यावेळी ही रक्कम दिली नव्हती.
उर्वरित अनुदानासाठी पुन्हा 20 हजारांची मागणी
यानंतर तक्रारदाराने घरकुलाच्या उर्वरित अनुदानाची रक्कम चौकशी करण्यासाठी 13 ऑगस्ट 2026 रोजी पंचायत समिती कार्यालयात जाऊन मनमोहन राजपूत याची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार धुळे एसीबीकडे करण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत मनमोहन राजपूत याने तक्रारदार व त्याच्या नातेवाईकांच्या घरकुलांचे उर्वरित अनुदान अदा करण्याची कार्यवाही करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
ठेकेदाराच्या हस्ते स्वीकारली लाच
लाचेच्या मागणीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने सोमवारी सापळा रचला. कारवाईदरम्यान मनमोहन राजपूत याने शासकीय ठेकेदार रोहन देवरे याच्याहस्ते लाच स्वीकारली व हा सापळा साक्री शहराबाहेरील धुळे रोडवरील शेवाळी फाट्याजवळ यशस्वी करण्यात आला. त्यानंतर राजपूत यासही अटक करण्यात आली. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रितेश चौधरी, हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने अन्य व्यक्तीने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
