शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी : मालेगावातील चौकडी जाळ्यात
शिरपूर (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : शिरपूर शहरातील सराफा दुकानातून झालेल्या चोरीचा शिरपूर शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून छडा लावला आहे. या प्रकरणात मालेगावातील तीन महिला व एका पुरुषास अटक करण्यात आली. आरोपींकडून नऊ लाख 10 हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.
सराफा दुकानात हातोहात ऐवज लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान फिर्यादी सुरेंद्र सन्मुखलाल सराफ (शिरपूर) यांच्या सराफा दुकानात तीन बुरखाधारी महिलांनी सहा लाख रुपये किंमतीचे 40 गॅ्रमचे कानातले लंपास केले होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज ठरले तपासातील महत्त्वाचा दुवा
घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. दुकान परिसरासह संभाव्य मार्गांवरील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान संशयित महिलांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी वाहनांचे क्रमांक, हालचाली तसेच चोरीनंतर आरोपींनी वापरलेल्या मार्गांचा मागोवा घेतला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.
मालेगाव येथून आरोपींना ताब्यात
तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालेगाव परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अन्नु उर्फ साजीदा बशीर खान (36, रा.कमालपुरा, मालेगाव, जि.नाशिक), मन्नु उर्फ मनसुजा शेख गमीर (23), रिजवाना जाकीर शेख (35, दोन्ही रा.विजय नगर, इकबाल डाबीजवळ, मालेगाव, जि.नाशिक), चालक नदीम शेख गयासोद्दीन शेख (42, अयुब नगर, मालेगाव, जि.नाशिक) यांना अटक करण्यात आली.
नऊ लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली. आरोपींकडून चोरीचा एकूण 9 लाख 10 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यात तीन लाखांची स्वीप्ट कार (एम.एच.05 ए.एक्स.7685), दहा हजारांचा मोबाईल, सहा लाख रुपये किंमतीची 40.120 गॅ्रम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली.
आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल
तपासादरम्यान अटक करण्यात आलेली आरोपी अन्न ऊर्फ साजिदा बशीर खान हिच्यावर यापूर्वी नागपाडा (मुंबई) पोलीस ठाण्यात तीन तर कुला, मुंबई पोलिसात एक गुन्हा दाखल आहे तर आरोपी मन्नु ऊर्फ मुनसजा शेख गमीर विरोधात कुर्ला, मुंबईत गुन्हा दाखल आहे.
पोलीस पथकाच्या कामगिरीचे कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आनंद, मालेगाव पोलीस अधीक्षक श्री. अमित देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे किशोरकुमार परदेशी, पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल, भटू साळुंखे, सचिन वाघ, प्रशांत पवार, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, वर्षा चौधरी, मोहिनी कोकरे, चित्रा पावरा, होमगार्ड मिथून पवार आदींच्या पथकाने केली.
