फैजपूर पोलीस अॅक्शन मोडवर : वाहतूक नियम मोडणार्यांविरोधात धडक कारवाई
फैजपूर (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : फैजपूर पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी छत्री चौक तसेच सुभाष चौक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर तब्बल 78 केसेस करण्यात आल्या. या कारवाईत एकूण 49 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
17 ऑगस्ट रोजी पोलिसांनी विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगांविरोधात कारवाई केली. विनापरवाना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, हेल्मेटचा वापर न करणे, पोलिसांच्या इशार्याचे उल्लंघन, अतिरिक्त प्रवासी वाहून नेणे, फ्रंट सीटवर प्रवासी बसविणे, ट्रिपल सीट प्रवास, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे तसेच नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे आदी नियमभंगांवर कारवाई करण्यात आली. या दिवशी एकूण 39 केसेस करण्यात आल्या व 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतुकीच्या दोन केसेस न्यायालयीन प्रक्रियेसाठी प्रलंबित आहेत.
सलग दुसर्या दिवशीही कारवाई
पोलिसांनी 18 ऑगस्ट रोजीही ही विशेष मोहीम सुरू ठेवली. या दिवशी विनापरवाना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, विनाहेल्मेट वाहन चालविणे, अतिरिक्त प्रवासी वाहून नेणे, फ्रंट सीटवर प्रवासी बसविणे, ट्रिपल सीट प्रवास आणि नो-पार्किंग अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतही 39 केसेस नोंदविण्यात आल्या असून 26 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतुकीची एक केस न्यायालयीन प्रक्रियेसाठी प्रलंबित आहे.
वाहन चालक धास्तावले
दोन दिवसांत पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणार्या वाहनचालकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली. शहरातील प्रमुख चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासणीमुळे नियमांचे पालन करण्याबाबत वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे.
नियमभंग करणार्यांविरोधातही धडक कारवाया
फैजपूर पोलिसांकडून यापुढेही वाहतूक नियमभंग करणार्यांविरोधात अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केवळ दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहनचालकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करून अपघातांना आळा घालावा, यावर पोलिसांनी भर दिला आहे.
वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन
सहा.निरीक्षक संदीप पाटील वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन वाहनधारकांना केले आहे. लहान मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास टाळावा, असेही ते म्हणाले.

