भुसावळात मोबाईल दुकान फोडले : 19 हजारांचा मुद्देमाल लंपास


भुसावळ (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : भुसावळ शहरातील उदासी कॉम्प्लेक्स परिसरातील मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
गणेश प्रदीप विसे (36, रा.शिवधाम मंदिराजवळ, जळगाव) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे उदासी कॉम्प्लेक्समध्ये बोंडे हॉटेलजवळ ‘रुद्रा मोबाईल रिपेअरिंग’ नावाचे दुकान आहे. या दुकानावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घर गाठले. दुसर्‍या दिवशी बुधवार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यावर दुकानाचे कुलूप तुटलेले आढळले.

19 हजारांचा मुद्देमाल लंपास
शटर उघडून आत गेल्यावर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले रोख पैसे व ग्राहकांचे मोबाईल तपासले असता ते चोरीस गेले असल्याचे निदर्शनास आले. चोरीमध्ये अंदाजे 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून त्यात तीन हजार रोख तसेच विवो, एमआय टेन 5जी व रिअलमी टेन प्रो या कंपन्यांचे प्रत्येकी सुमारे 5 ते 6 हजार रुपये किंमतीचे मोबाईल समाविष्ट आहेत. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !