यावलच्या बाल संस्कार विद्या मंदिरात ‘महा.अंनिस’तर्फे चमत्कार सादरीकरण
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न : प्रा. दिगंबर कट्यारे यांनी उलगडले चमत्कारांमागील वैज्ञानिक सत्य
यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानाची कास धरून प्रत्येक घटनेकडे तर्कशुद्ध व चिकित्सक दृष्टीने पाहिले पाहिजे असे प्रतिपादन अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे यांनी केले ते यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ’चमत्कार सादरीकरण’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमात बोलत होतेफ
यांची होती उपस्थिती
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यावल शाखेतर्फे स्थानिक बाल संस्कार विद्या मंदिरात विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘चमत्कार सादरीकरण’ कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात महाराष्ट्र अंनिसच्या वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प विभागाचे कार्यवाह प्रा.दिगंबर कट्यारे यांनी विविध भोंदूगिरी व चमत्कारांचे थेट प्रात्यक्षिक सादर केले.
तथाकथित चमत्कारांमागे लपलेली वैज्ञानिक कारणे त्यांनी अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कोणत्याही दाव्यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि सतत प्रश्न विचारण्याची वृत्ती अंगी बाणवणे ही काळाची गरज असल्याचे प्रा.कट्यारे यांनी यावेळी नमूद केले.
या प्रबोधनात्मक उपक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल गर्गे, सुनिल देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महाराष्ट्र अंनिस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोर्हाडे व यावल शाखेचे कार्याध्यक्ष प्रशांत महाजन यांनी सहकार्य केले.
अंधश्रद्धेऐवजी विज्ञानाची धरा कास
बाल संस्कार विद्या मंदिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रात्यक्षिकांसह चमत्कार सादरीकरण. चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे स्पष्ट करून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेऐवजी विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले.


