यावल नगरपरिषदेकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सर्वेक्षण

30 ऑगस्टपूर्वी नोंदणी करण्याचे नगराध्यक्ष छाया पाटील यांचे आवाहन


यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या अडचणी व गरजा प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि महिला सक्षमीकरणाला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने यावल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील पात्र महिलांचे विशेष सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.

महिलांना लाभ घेण्याचे आवाहन
लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील यांनी या उपक्रमाची माहिती देत पात्र महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. नगरपरिषद हद्दीतील रहिवासी असलेल्या पात्र महिलांची माहिती संकलित करून त्यांना उपलब्ध असलेल्या महिला-केंद्रित शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. विशेषतः विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच 35 वर्षांवरील अविवाहित महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक गरजा समजून घेण्यास मदत होणार असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे कोणतीही पात्र महिला या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी नगरपरिषदेने विशेष आवाहन केले आहे. नगरपरिषदेच्या वतीने 20 ऑगस्ट 2026 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सर्वेक्षण व नोंदणी केली जाणार आहे.

पात्र महिलांनी आवश्यक माहितीसह यावल नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहून आपली नोंदणी करून घ्यावी.महिला सक्षम तर समाज समृद्ध; चला, एक पाऊल सशक्तीकरणाकडे या संदेशातून नगरपरिषदेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.महिलांना केवळ योजनांची माहिती मिळणे नव्हे, तर त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पात्र महिलांची अचूक माहिती उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर यावल नगरपरिषदेचा हा उपक्रम महिलांसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !