जळगावात अवजड वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
जळगाव (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : शहरातून जाणारी अवजड वाहतूक वाहनधारकांच्या जीवावर उठली आहे तर जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. गुरुवार, 20 सकाळी बांभोरी पुलाजवळ अवजड वाहनाच्या धडकेने अॅक्टीव्हा स्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. योगेश महाजन असे मृताचे नाव आहे.
असे आहे अपघात प्रकरण ?
जळगावच्या इच्छादेवी चौक परिसरातील रहिवासी योगेश महाजन हे गुरुवारी सकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान बांभोरी पुलाजवळून अॅक्टीव्हावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, योगेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.
तरसोद-पाळधी बायपास मार्गाची अवस्था खराब असल्याने या मार्गावरील वाहतूक शहरातून वळविली जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी शहरातील जुन्या महामार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढली असून, विविध ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अजिंठा चौफुलीजवळ भाजी विक्री करणार्या महिलेचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरातून जाणार्या जुन्या महामार्गावरील अपघातांना आळा बसलेला नाही.


