यावल-भुसावळ रस्त्यावर निमगावजवळ धोकादायक खड्डे : वाहनचालकांचा जीव धोक्यात
यावल (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : यावल-भुसावळ मार्गावरील निमगावजवळ इंझवाय नदीच्या पुलावर मोठमोठे व धोकादायक खड्डे पडले असून या मार्गावरून ये-जा करणार्या वाहन-चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.
वाहन धारकांचा जीव धोक्यात
इंझवाय नदीवरील पुलावर अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. मोठ्या आकाराचे खड्डे पडल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवून वाहने चालवावी लागत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
यावल-भुसावळ हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे पुलावरील खड्ड्यांची तातडीने डागडुजी करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


