यावलला बस लोकार्पण सोहळ्यात लोकनियुक्त नगराध्यक्षांचा अपमान : शिवसेना-उबाठाकडून निषेध
प्रोटोकॉलचे उल्लंघन करणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाईची मागणी
यावल (रविवार, 23 ऑगस्ट 2026) : यावल बसस्थानकात बसेसच्या लोकार्पण सोहळयात नगराध्यक्ष छायाताई पाटील यांचा जाणीवपुर्वक शिष्टाचार डावलून अपमान करण्यात आला. हा घडलेला प्रकार हा केवळ एका व्यक्तीचा अवमान नसून यावल शहरातील सर्व नागरिकांचा अपमान आहे. शहरातील शिवसेना-उबाठाकडून तातडीची बैठक बोलावून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. प्रोटोकॉलचे उल्लंघन करणार्या संबंधित शासकीय अधिकार्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
काय घडले यावल शहरात ?
यावल बसस्थानकात रविवारी राजमाता जिजाऊ बसेसचा लोकापर्ण कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी नगराध्यक्ष छायाताई पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांना मोबाईलवर संपर्क करीत आमंत्रण दिले होते व कार्यक्रम हा आगाराचा होता. या कार्यक्रमात भाजपाच्या पदाधिकार्यांनी हेतु पुरस्कर प्रोटोकॉलचे उल्लंघन करीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पाटील यांचा अपमान केला. यानंतर उभयतांंनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.



हा तर यावल शहरवासीयांचा अवमान
या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख शरद कोळी यांनी तातळीची बैठक बोलावली व या घटनेचा उबाठाकडून निषेध करण्यात आला. कार्यक्रम शहरात होता व सध्या तालुक्यात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार व त्यांच्यानंतर नगराध्यक्ष आहेत. हा घडलेला प्रकार हा केवळ एका व्यक्तीचा अवमान नसून यावल शहरातील सर्व नागरिकांचा अपमान आहे म्हणून संबंधित शासकीय अधिकार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यापुढे यावल शहरातील कोणत्याही शासकीय कार्यालयात आयोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षांचा योग्य सन्मान व शासकीय प्रोटोकॉल पाळलाच गेला पाहिजे. प्रोटोकॉलचे उल्लंघन करणार्या संबंधित शासकीय अधिकार्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने सडेतोड उत्तर देण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे तालुकाप्रमुख शरद कोळी यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी संतोष खर्चे, पप्पू जोशी, जगदीश कवडीवाले, निलेश बारी, नगरसेविका वैशाली बारी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, कडू पाटीलसह मोठ्या संख्येत उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस-उबाठा नगरसेवकांकडून निषेध
घडल्या प्रकारानंतर नगराध्यक्षा छायाताई पाटील यांच्या कार्यालयात नगरपालिकेतील काँग्रेससह उबाठा व अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत घटनेचा निषेध केला. यावेळी नगरसेवक पराग सराफ, निसार मोमीन, इमाम रजा खान, उपनगराध्यक्ष सईदाबी मो.याकुब, नगरसेविका रुबीनाबी कच्छी, शालुबाई भालेराव, शिला सोनवणे, कमरूनिस्साबी सैफुद्यीन, समीर खान, उमर कच्छी, काँग्रेस शहराध्यक्ष मो. हकीम मो. याकुबसह आदींची उपस्थिती होती.
