भुसावळात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तापीनदी परिसरात वृक्षारोपण
भुसावळ (रविवार, 23 ऑगस्ट 2026) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित) तर्फे शहरातील नंदनवन कॉलनी, भुसावळ यांच्या पर्यावरण विभागांतर्गत तापीनदी परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
या अभियानात वड, पिंपळ, बेल, बेहडा, चिंच आणि औदुंबर आदी विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.



वृक्षारोपण अभियानासाठी परिसरातील स्थानिक सेवेकरी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. उपस्थितांनी रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही केला.
पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमासाठी सेवेकरी सुनील सोनवणे, रितेश जगताप, महेश पाटील, हेमराज भोळे, महेश भोई, अथर्व इंगळे, निखील पाटील, लोकेश भोईटे, प्रथमेश पाटील आदींची उपस्थिती होती.


