जळगावात उच्चभ्रू वस्तीत स्पा सेंटरआड देहविक्रीचा व्यवसाय : जागा मालकासह दोघांविरोधात गुन्हा

सिक्कीम, मणिपूर, पश्चिम बंगालसह नेपाळच्या सहा तरुणींची सुटका


जळगाव (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : जळगावातील उच्चभ्रू वस्तीत स्पा/मसाज सेंटरआड सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा जिल्हापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला. विशेष म्हणजे मसाजच्या नावाखाली सिक्कीम, मणिपूर, पश्चिम बंगालसह नेपाळहून तरुणी आणण्यात आल्या होत्या व त्यांच्यामार्फत अश्लील कामे करून घेण्यात येत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सहा तरुणींची सुटका करीत जागा मालकासह स्पा मालकाविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण ?
जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्पा सेंटर मध्ये मसाज सेवांच्या नावाखाली व्यावसायिक लैंगिक व्यापार (वेश्याव्यवसाय) चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. हा प्रकार ‘अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, 1956’ अंतर्गत येत असल्याने पोलिसांनी अचानक छापा मारून ही कारवाई केली.


पोलिसांनी घटनास्थळावरून मसाज थेरपिस्ट म्हणून काम करणार्‍या सहा पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली. यामध्ये दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथील 26 वर्षीय महिला, मणिपूर येथील 31 व 37 वर्षीय महिला, पूर्व सिक्कीम येथील 30 व 31 वर्षीय महिला, आणि नेपाळच्या बांके येथील 26 वर्षीय परदेशी महिलेचा समावेश आहे. नेपाळ येथील महिलेच्या पासपोर्ट, व्हिसा स्थिती आणि सीमापार प्रवासाच्या पार्श्वभूमीची पोलीस सध्या सविस्तर पडताळणी करत आहेत.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
नीरज सिंह पंड्या (रा. मुखर्जी नगर, रतलाम, मध्य प्रदेश) हा स्पाचा मालक व परवानाधारक असून स्पाच्या आडून वेश्याव्यवसाय चालवणे, व्यवस्थापन करणे व सुविधा पुरवण्यामागील मुख्य सूत्रधार आहे तसेच राजेंद्र पुंडलिकराव चव्हाण (रा.यशवंत कॉलनी, रिंग रोड, जळगाव) हा जागेचा मालक व परवाना दाता असून त्याने बेकायदेशीर कारवायांसाठी आपली जागा भाडेतत्त्वावर दिल्याने त्यालादेखील सहआरोपी करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !