भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी शिवसेनेच्या ‘शिंदे’ गटात

राजकीय समीकरणे बदलणार ? माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळेही सेनेत


गणेश वाघ
भुसावळ (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : भुसावळच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रहारचे जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बुधवार, 2 सप्टेंबर रोजी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भुसावळच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

विधान परिषद निवडणूक गाजवली
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे लहान बंधू असलेल्या अनिल चौधरी यांनी अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठे राजकीय आव्हान उभे केले होते शिवाय जळगावमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली होती. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची भूमिका घेत त्यांनी जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या बैठका घेतल्या मात्र अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आलेल्या एका फोनमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. शिवाय 2010 मध्येही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना चौधरी यांना माघार घेण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी चौधरी यांच्याशी अनेकदा संवाद साधल्याचेही बोलले जात होते. मात्र, चौधरी यांनी अखेरच्या कोणत्याही उमेदवाराला थेट पाठिंबा न देता निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला.


नव्या राजकीय समीकरणांची नांदी
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनिल चौधरी हे त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपद मिळाले होते मात्र बच्चू कडू हे शिंदेसोबत गेल्याने त्यांनीदेखील धनुष्यबाण हाती घेतला आहे. चौधरी यांनी मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ बंगल्यावर बुधवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करून काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. चौधरी यांच्या पक्ष प्रवेशामुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणात अनेक चर्चांना सुरूवात झाली आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुका आणि विविध राजकीय गटांतील संभाव्य आघाड्या या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवेशाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

राज्यात शिवसेना वाढवणार! आजीवन साहेबांसोबतच ; अनिल चौधरी
विधानपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही फार्म मागे घेतला होता. संघर्षातून वलय निर्माण करणारे उपमुख्यमंत्र्यांचे व्यक्तीमत्व असून संपूर्ण जीवन आता साहेबांसोबत व्यतीत करायचे आहे, राज्यभरात शिवसेना वाढवायची आहे, असे अनिल चौधरी म्हणाले. आपल्यासोबत भुसावळच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व निखील संतोष चौधरी यांनीदेखील प्रवेश केल्याचे ते म्हणाले.

भुसावळातील अल्पसंख्यांक भागाचा विकास होणार
चौधरी म्हणाले की, भुसावळातील अल्पसंख्यांक भागाचा विकास थांबला आहे त्यामुळे साहेबांच्या आदेशानुसार आता येथून पुढे काम करणार आहोत. भुसावळच्या अल्पसंख्यांक भागासाठी निधी देण्याचे आश्वासन आम्हाला मिळाले असून पक्ष संघटना मजबूत करण्याचा संदेशही साहेबांनी दिला आहे. मोठे बंधू माजी आमदार संतोष चौधरी यांनादेखील सोबत येण्याची विनंती केली मात्र त्यांनी आपली पवार साहेबांवर निष्ठा असल्याचे सांगितले. यापुढे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने प्रत्येक काम करू, असेदेखील चौधरी म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !