राज्यात पुन्हा पावसाचा जोर ; पुढील चार दिवस जोरदार सरींचा अंदाज
मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र अन् अरबी समुद्रातील द्रोणीय स्थितीचा परिणाम; विदर्भातील अमरावती, गोंदियाला ऑरेंज अलर्ट
मुंबई (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : पावसाने काही दिवस घेतलेली विश्रांती संपली असून राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. मध्य प्रदेश व लगतच्या परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच ईशान्य अरबी समुद्रातील द्रोणीय स्थितीमुळे राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागांत हलक्या ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकले. त्याच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. गुरुवारी विदर्भातील अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांसह उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा परिणाम
बंगालच्या उपसागरातील नवीन हवामान प्रणाली मध्य भारताच्या दिशेने सरकत आहे. ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून ही प्रणाली पुढे सरकत असल्याने 4 ते 10 सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात या हवामान बदलाचा प्रभाव अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरात सोसाट्याच्या वार्यासह पावसाची शक्यता
छत्रपती संभाजीनगर शहरात गुरुवारी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी शहरात कमाल तापमान 29.8 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभरात 0.2 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी हवेतील आर्द्रता 85 टक्के, तर सायंकाळी 69 टक्के होती. 4 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या एक-दोन सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
जळगावात तापमान तीन अंशांनी घसरले
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. दिवसभर दाटून येणारे ढग आणि अधूनमधून पडणार्या हलक्या सरींमुळे कमाल तापमानात सुमारे तीन अंशांची घट झाली आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने पहाटे आणि रात्री गारवा जाणवू लागला आहे. हे वातावरण आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी व्यक्त केली.
जळगावात पुढील चार दिवस पावसाच्या सरी
3 सप्टेंबर : काही भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता.
4 सप्टेंबर : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज.
5 सप्टेंबर : काही निवडक भागांत रिमझिम आणि हलक्या सरी.
6 सप्टेंबर : आकाश ढगाळ राहण्याची शक्यता; शहरासह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद होऊ शकते.


