वरणगावातील जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या खोल्या तातडीने पाडा : जागा व्यापारी संकुलासाठी नगरपरिषदेला द्या : नगराध्यक्ष सुनील काळे

जि.प.सीईओंना निवेदन : चार महिन्यांपासून जन्म-मृत्यूच्या ऑनलाईन नोंदी रखडल्या ; नागरिकांचे हाल थांबविण्याची मागणी


वरणगाव (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : वरणगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील जीर्ण व पडक्या खोल्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून उर्वरित जवळपास दोन एकर जागा व्यापारी संकुल उभारण्यासाठी वरणगाव नगरपरिषदेला हस्तांतरित करावी, अशी मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडे केली.

दोन एक जागा वापराविना पडून
वरणगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीची जवळपास दोन एकर जागा अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. या जागेवर शाळेच्या सुमारे 30 खोल्या असून त्यापैकी अनेक खोल्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. सध्या केवळ दोन खोल्यांमध्ये वर्ग भरविले जात असून विद्यार्थ्यांची संख्याही अत्यल्प असल्याचे नगराध्यक्ष काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. पडक्या खोल्यांमुळे परिसराचा गैरवापर होत असल्याने या खोल्या तातडीने निर्लेखित करून पाडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.


तर पालिकेच्या उत्पन्नात होईल वाढ
या जागेचा विकास करून व्यापारी संकुल उभारल्यास नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडण्याबरोबरच शहराच्या विकासालाही चालना मिळू शकते. त्यामुळे पडक्या खोल्या हटवून उर्वरित जागा नगरपरिषदेला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सात महिन्यांपूर्वी प्रस्ताव : अद्याप कार्यवाही नाही
वरणगाव नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सुनील काळे यांनी हा प्रस्ताव सुमारे सात महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केला. यासंदर्भात भुसावळ गटशिक्षणाधिकार्‍यांनीही पडक्या व रिकाम्या खोल्या निर्लेखित करून पाडण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केल्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

जागा हस्तांतरीत करण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक नाना चौधरी, जनसेवक मिलिंद भैसे आणि आकाश निमकर यांनी जिल्हा परिषदेत जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची भेट घेत निवेदन सादर केले. पडक्या खोल्या तातडीने पाडून जागा नगरपरिषदेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जन्म-मृत्यूच्या ऑनलाइन नोंदी चार महिन्यांपासून रखडल्या
दरम्यान, वरणगाव शहरातील नागरिकांच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या ऑनलाइन नोंदींचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या चार महिन्यांपासून आरोग्य विभागाकडे ऑनलाइन नोंदी प्रलंबित असल्याने नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जन्म-मृत्यूची नोंदणी ही नागरिकांच्या विविध शासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे ऑनलाइन नोंदी रखडल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत प्रलंबित नोंदींचे काम मार्गी लावावे, अशी मागणी नगराध्यक्ष काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली. दोन्ही प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !