एरंडोल शहरातील हॉटेल चालकाकडे धाडसी घरफोडी : साडेतीन लाखांच्या रोकडसह सात लाखांचा ऐवज लांबवला
एरंडोल (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत साडेतीन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून सात लाख आठ हजारांचा ऐवज लांबवला. ही धाडसी घरफोडी एरंडोलच्या अष्टविनायक कॉलनी परिसरात घडली. ‘हॉटेल माउली’चे संचालक निखिल अनिल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
घर बंद असल्याची साधली संधी
‘हॉटेल माउली’चे संचालक निखिल अनिल चव्हाण हे अष्टविनायक कॉलनीत वास्तव्यास आहेत. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 3 सप्टेंबर रोजी रात्री 12.25 दरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत घराच्या दर्शनी भागातील दोन दरवाजांना लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटाचे ड्रॉवर तोडत त्यातील साडेतीन लाखांची रोकड तसेच 25 ग्रॅम व 12 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, आठ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 12 गॅ्रम वजनाचे कानातील जोड, 50 ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती असा एकूण सात लाख आठ हजारांचा ऐवज लांबवण्यात आला.

पोलिसांची भेट : फुटेजची तपासणी
याप्रकरणी निखिल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक शंकर पवार करीत आहेत. पोलिसांनी संशयीतांची तपासणी सुरू केली असून या भागातील फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

